कविता-प्रमाणामध्ये-सर्व-काही-असावे
Posted in: जीवनशैली (Lifestyle)

प्रमाणामध्ये सर्व काही असावे – Everything should be in proportion 2021

माझ्या लहान चुलत भावाला आज वाटलं की आपण चहा करावा. आई जसा रोज चहा करते भैय्या, बाबा, ताई पण कधीकधी करतात. मग चांगला झाला की सगळे ज्यांनी केला त्यांचे कौतुक करतात. मग तो म्हणाला मला पण चहा येतो मी पण चहा करणार. मी म्हणालो ठिक आहे कर. त्याने केला आणि आणि एक घोट घेतो तर काय कडूss.. (बरंय आम्ही दोघेच होतो चहा घ्यायला :D). मी म्हणलं अरे एवढी पत्ती नसते रे चहा मध्ये. प्रमाणात असावी. एक कपला एक छोटा चमचा. एवढंच. आणि मी एक नकळत डायलॉग पण मारला “प्रमाणामध्ये सर्व काही असावे” ;).

प्रमाणामध्ये-सर्व-काही-असावे

मग लगेच क्लीक झालं ही तर शाळेत कितिवीत तरी कविता होती आपल्याला. मग काय गुगलबाबा की जय!! लगेच सर्च केलं. मग सापडली कविता. आधीच लॉकडाऊन. सगळ्यांना सविस्तर वाचून दाखवली. सहकुटुंब रसग्रहण केलं म्हणा ना! म्हणलं लगेच जरा पॉसिटीव्हीटी पसरवू. लोक पण आठवणी काढतील शाळेतल्या. मग हीच कविता संक्षिप्त अर्थासहित खाली दिली आहे. नक्की वाचा खूप काही घेणासारखं आहे. ‘अति तेथे माती’ ही मराठी म्हण किंवा ‘अति सर्वत्र वर्जयेत।’ हे संस्कृत वचन याचे स्पष्टीकरण किंवा परिणाम काय होतो हे ही कविता पूर्ण स्पष्ट करते. या कवितेचे लेखक ‘कृष्णाजी नारायण आठल्ये‘ यांची आहे. (आपला दोस्त गुगल्या लई ज्ञानी आहे त्याला (जवळ जवळ) सगळं माहिती असतं 😀 ) तर कविता खाली दिली आहे नक्की आस्वाद घ्या..

प्रमाणामध्ये सर्व काही असावे कविता आणि अर्थ

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

प्रमाणामध्ये-सर्व-काही-असावे

अतिशय क्रोध केल्याने काम पूर्ण होत नाही किंवा कामाची वाट लागते. जास्त नम्रपणे वागले तर समोरच्याला वाटते की हा भित्रा आहे. अति करू नये. सर्वकाही प्रमाणात असावे.

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अति लोभ करणाऱ्याची लोक लाज काढतात आणि अति त्याग ज्याने केला तो मृत आहे. सदैव समाधानी आणि नियमात असे सर्वाना दिसावे.

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

जास्त मोह केला आणि ती गोष्ट नाही मिळाली की ते शोकाचे किंवा दुःखाचे मूळ होते. अति काळजी करणारा खुळा किंवा वेडा वाटतो. मोह किंवा काळजी न करता चांगल्या विचारानी मनाला घट्ट बांधून ठेवावे.

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

जास्त म्हणजे प्रमाणाबाहेर अभ्यास केल्याने शरीर क्षीण होते. आणि कोणताही खेळ इथे अर्थ जुगार अति खेळने म्हणजे भिकेचे डोहाळे लागणे. कष्ट किंवा काम करणे सोडून रिकामे बसू नये.

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अति दान केल्याने संसारात तुटवडा निर्माण होतो. अति कंजूषपणा पण दारिद्र्य आणतो. काय योग्य आहे ते स्वतःच्या मनाला विचारावे.

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

कामापेक्षा जास्त भोजन केल्याने शरीरातील रोग वाढतात. आणि अति उपाशी राहिल्यानेही माणसाला त्रास होतोच. मग असे झाले तर देवावर का रुसायचं?

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

प्रमाणाबाहेर प्रेम एखाद्या व्यक्तीवर केलं तर तो व्यक्ती आपले ऐकत नाही उदंडपणा करतो. एखाद्याचा अति द्वेष करणे म्हणजे स्वतः यातना भोगणे. त्यामुळे कोणाचाही मत्सर करु नये.

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अति आळस करणारा प्रेतासमान असतो. आणि अति झोपा काढणारा पण तसाच म्हणजे प्रेतासारखाच आहे. त्यामुळे सतत चांगले कर्म करून आत्म्याला आराम द्यावा म्हणजे आत्मतृप्त व्हावे.

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

जास्त धनाच्या मिळवण्याची वृत्ती पाप म्हणजे वाईट कामे करण्यास प्रवृत्त करते. याउलट अति दारिद्र्यात राहणे म्हणजे काही न कमावता अर्धपोटी राहून सुखी राहणे पण नरकवासा समान आहे. जास्त धन मिळवायच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये.

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अति भाषण ठोकल्याने बुद्धिवंत लोक कंटाळतात. आणि अति मौन किंवा शांत राहणारा मूर्ख समजला जातो. जे खरे तत्व किंवा विचार आहे ते कमीत कमी शब्दात मनावर ठसवावे.

हे पण वाचा: चेटकीण नारायण धारप कादंबरी Review

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

जास्त वाद सत्यपासून दूर नेतो. आणि हो मध्ये हो मिळवणारा नीच समजला जातो. म्हणून वाद घालताना किंवा हो ला हो करताना योग्य काय आहे याचे ज्ञान घेऊन ते करावे.

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

प्रमाणाबाहेर औषधे खाल्याने रोग बळावतात. आणि जास्त उदासीन राहिल्याने भोग वाढतात. जे हिताचे उपाय आहेत ते करण्यास आळस करू नये.

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

जास्त दाट गर्दी असलेल्या वस्तीमध्ये जगण्यात मर्यादा येतात. आणि अति सुनसान जागेत जीव उदास होतो. म्हणून लहान गाव पाहून तिथे स्थायिक व्हावे.

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

जास्त शोक केल्याने दुःख वाढतच जाते. क्षुद्रबुद्धीचे लोक छोट्या गोष्टीमध्ये अति आनंदित होतात. म्हणून जे नशिबात आहे ते घडणारच त्याच्यासाठी शोक करू नये.

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

एखादया गोष्टीचे जास्त भूषण म्हणजे show off केल्याने संकट निर्माण होते. आणि अति थाट केल्याने ते नाटक वाटते. त्यामुळे असे राहावे की कुणी हसले नाही पाहिजे.

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

जास्त स्तुती करणाऱ्याला कुत्र्याची उपमा दिली जाते. आणि प्रमाणाबाहेर निंदा करणारा दुष्ट असतो. कोणालाही कडू बोलून दुखवू नये.

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अति भांडणे केल्याने यादवकुळाचा प्रभासक्षेत्रावर नाश झाला. अति हट्ट केल्याने कौरवांचा नाश कुरुक्षेत्रावर झाला.

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

रोज गोड खाणे चांगले नसते. अति कमी दर्जाचे अन्न पण खाऊ नये. जास्त गहू खाऊ नये. (कदाचित लठ्ठपणा वाढतो म्हणून असे कवींनी म्हणले असावे)

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

जुन्या गोष्टींना चिकटून बसणारे आणि नव्याचे स्वागत न करता तिरस्कार करणारे हटवादी मानले जातात. आणि विनाकारण नव्या गोष्टीचे गुण गाणारा त्या गोष्टीच्या नादी लागला आहे असे समजले जाते. या दोन्हीचे सार म्हणजे कामाचा भाग शोधून आपला उत्कर्ष करून घ्यावा.

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

सतत पद्य म्हणजे कविता किंवा गाणे घोकून ते कंटाळवाणे होते किंवा शीण येतो. आणि सतत गद्य म्हणजे निबंधरूपी वाचत राहिल्यानेही त्रास होतो. त्यामुळे कधी हे कधी ते असे वाचावे जेणेकरून कशाचाच कंटाळा येणार नाही आणि ज्ञानात भर पडत राहील.

अशा प्रकारे सर्व गोष्टी प्रमाणामध्ये असाव्यात..धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top