Posted in: जीवनशैली (Lifestyle)

पुणे/PCMC जवळ अर्ध्या दिवसाची पिकनिक | घोरावडेश्वर मंदिर-टेकडी-लेणी, बिर्ला गणपती मंदिर आणि कुंडमळा (A Half day trip near Pune/PCMC | Ghoravadeswar Temple Hill Caves, Birla Ganapati Mandir and Kundmala)

घोरवडेश्वर मंदिर आणि लेण्या ट्रेक पॉइंट

त्या दिवशी आम्ही वीकेंड ला पुण्याजवळ रविवारी फिरायला कुठे जावे यावर विचार करत होतो. कारण पूर्ण दिवस वेळ नव्हता. मित्राला महत्त्वाचें काम असल्यामुळे लवकर परत यावे लागणार होते आणि सगळी पर्यटन स्थळे तशी एक दिवस तरी किमान घेतात. पण जायचे तर होते गेल्याशिवाय आमचा फिरस्ती किडा गप कसा बसेल. खर तर गप गुमान मोबाईल वर किंवा सगळ्यांच्या आवडत्या इंस्टा वर शॉर्ट्स व्हिडिओ बघत बसण्यात ते थ्रील नाही जे डोंगरदऱ्या तुडवण्यात आहे.

तर मग शेवटी एक स्पॉट सापडला घोरवडेश्वर मंदिर ट्रेक. जिथं आम्ही अजून गेलो नव्हतो किंवा कल्पना केली नव्हती की आपल्या इतक्या जवळ एवढा भारी स्पॉट असेल. तसं तर आम्ही त्यावेळी पिंपरी चिंचवड मध्ये होतो. तिथून फक्त 20 किलोमीटर. आणि अर्थात इतर डोंगर, किल्ले घाटापेक्षा जवळ हा डोंगर आणि लेण्या आणि महत्वाचे म्हणजे महादेवाचे मंदिर आहे. गाडीला टाच मारायचा उशीर होता.

हे डोंगर चढल्यावरचे फोटो आहेत. आम्ही गुगल वर लोकेशन टाकून निघालो होतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सगळे रस्ते माहीत असणाऱ्यांसाठी जर थोडक्यात मार्ग सांगायचा झाला तर जूना आणि नवा पुणे ते मुंबई हायवे मुंबईकडे जाताना जिथे जोडला जातो त्याच्या थोडासा पुढे जावे लागेल.

जाताना पायऱ्या आहेत. जश्या गड किल्ल्यांना असतात. मोठमोठ्या पायऱ्या आहेत आणि बाजूला कठडा पण आहे. काही धोका नाही. मध्ये एका ठिकाणी पायऱ्या संपतात. तिथं कडा चढावा लागतो. परत पायऱ्या लागतात. मध्ये विश्रांती घ्यावी वाटली भरपूर झाडी आहे.

फोटोमध्ये दाखवलेल्या रस्त्यावरून पुढे गेले असता मंदिर आणि लेण्या लागतात. डावीकडून डोंगरमाथ्यावर जाता येते. डोंगरमाथ्यावर एक छोटे तळे आहे. पण याला बहुतेक फक्त पावसाळ्यात पाणी असते.

तिथे एक मामा मसाला काकडी, ताक, शरबत इत्यादी विकायला बसलेले असतात.

हे मामा बसतात त्याच्या समोर एक मोठा दगड किंवा मोठीच्या मोठी अखंड शिला आहे. तिथून पायथ्याच्या गावाचे आणि आर्मी रक्षित जंगलाचे विहंगम दुश्य पाहायला मिळते. इथून भंडारा डोंगर पण दिसतो.

घोरावडेश्वर वरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य @dongardarya.com
घोरावडेश्वर वरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य@dongardarya.com

एक गंमत सांगायची झाली तर आम्ही जेव्हा गेलो तिथं एक मुलामुलींचा ग्रुप लेणीच्या दरवाज्याला बसले होते. आणि आम्ही जाताना कराकरा चिप्स ची पाकिटे खात होते. आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेतले फोटो काढले थोडे बसलो आणि परत निघालो त्या लेणी जवळ आलो तरी ते तेव्हाही कराकरा चिप्स खातच होते. म्हणजे अगदी शांत बसून खात होते कुणीही एकमेकाशी काही बोलत नव्हते फित खात होते. जाता जाता माझ्या चेष्टाखोर मित्राला राहवले नाही तो म्हणालाच शेवटी “अरे किती खाता?” 🤣🤣😆🤣 आणि आमचा हास्यकल्लोळ.

तस तर या घोरवडेश्र्वर ट्रेक पॉइंट च्या जवळ इतरही छोटे छोटे पिकनिक पॉइंट आहेत. हा ट्रेक पॉइंट पाहून जर वेळ उरला तर जवळ घोरवडेश्वरच्या डोंगरावरून इंद्रायणी नदी दिसते. तिथे कुंडमळा हा एक नदीवरचा स्पॉट आहे.

घोरवडेश्वर महादेव मंदिरचे प्रवेशद्वार लागण्या आधी माता अमरदेवीचे ऐतिहासिक मंदिर लागते. या देवीला माता अमरजाई असेही नाव आहे. अत्यंत सुंदर आणि शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. माता अमरदेवी चे मंदिर हे महाभारतकालीन आहे असे म्हणतात. इथूनच घोरवडेश्वर ट्रेक पॉइंट च डोंगर चालू होतो. ट्रेकिंग इथून चालू करतात असे ऐकले होतो पण सध्या इकडून घोरवडेश्वर ला जाऊ देत नाहीत. घोरवडेश्र्वरच्या प्रवेशद्वारातूनच जावे लागते. माता अमरदेवी मंदिरापासून हायवेने पुढे गेल्यानंतर “ओम नमः घोरवडेश्वराय” असे नाव असलेले घोरवडेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार लागते.

घोरवडेश्वर मंदिर आणि बौद्धकालीन लेण्या बद्दल माहिती (Ghoravadeshwar Temple and Buddhists Caves information in Marathi)

घोरवडेश्वर हे नाव जवळच असलेल्या आणि इंद्रायणी काठी वसलेल्या घोरवडे या गावामुळे मिळाले आहे. हे ठिकाण सोमाटणे जवळ असलेल्या टोल नाक्यापासून जवळ NH4 हायवे वर आहे. इथूनच जवळच बिर्ला गणपती मंदिर आहे. जिथे गणपती बाप्पाची मोठी मूर्ती डोंगरावरून किंवा हायवे वरुनही दिसते. या डोंगरावर ज्या लेण्या आहेत त्या इसवी सन चौथ्या शतकातील आहेत असे सांगितले जाते.

घोरवडेश्वरला कसे जावे? (How to go to Ghoravadeshwar?)

तुम्ही ज्या भागातून येत असाल तिथून जुन्या किंवा नव्या पुणे मुंबई महामार्गावर यावे लागेल. तिथून हे दोन महामार्ग जिथे मिळतात आणि एक होतात तिथून पुढे अडीच किलोमीटर वर डावीकडे घोरवडेश्र्वर चे प्रवेशद्वार लागते. तिथे पे अँड पार्किंग पण आहे. टू व्हीलर किंवा फॉर व्हीलर पार्किंग करू शकतो.

हा ट्रेक कोणासाठी योग्य आहे? (Who is this trek suitable for?)

सर्व वयोगटातील व्यक्ती इथे जाऊ शकतात. ट्रेकिंगसाठी उत्सुक मंडळींनी तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्यावी. लहान मुलांसाठी पण नवीन अनुभव देणारी ही जागा आहे. इथे तास दीड तास डोंगर चढावा लागतो. काही उत्साही मंडळी चाळीस मिनिटात पण वरती जातात.

घोरवडेश्वर ला जाताना काय काळजी घ्यावी? (What should be taken care of while going to Ghorvadeshwar?)

इथे वरती पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तुम्ही जर जास्त वेळ डोंगरमाथ्यावरघालवणार असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवावी. गरज असेल तर खाद्यपदार्थ पण घेऊन जाऊ शकता. वरती मसाला काकडी किंवा इतर छोटे स्नॅक्स पण मिळतात.

पार्किंगनंतर प्रवेशद्वार लागते तिथे एक हॉटेल झालेले आहे. त्यात वडापाव आणि वेफर्स, कोल्ड्रिंक्स मिळतात.

कधी जावे किंवा कोणत्या सिझन मध्ये जावे? (Which season is good to go?)

घोरवडेश्वरला पावसाळ्यात जाणे योग्य आहे. ज्यावेळी भरपूर पाऊस पडून डोंगरदऱ्या मध्ये हिरवळ दाटली असेल. अशा वेळी स्वर्गीय अनुभूती येते. हिवाळ्यात पण हिरवळ असते. डोंगराच्या पायथ्याला पिवळ्या फुलांनी बहरलेले छोटे रोपे आलेली असतात.

उन्हाळ्यातही जायला हरकत नाही पण त्रास होऊ शकते आणि सगळ्या वनस्पती वाळून पिवळे झालेले असते. म्हणून पावसाळ्यातच जावे.

Comments (2) on "पुणे/PCMC जवळ अर्ध्या दिवसाची पिकनिक | घोरावडेश्वर मंदिर-टेकडी-लेणी, बिर्ला गणपती मंदिर आणि कुंडमळा (A Half day trip near Pune/PCMC | Ghoravadeswar Temple Hill Caves, Birla Ganapati Mandir and Kundmala)"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to Top